Friday, May 29, 2020

गांधी, सावरकर आणि राजकारण


फोटो सौजन्य: गुगलवरून साभार 
                                                                                    

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्ष पूर्ण झाली आहेत आणि हे स्वातंत्र्य इतक्या सहजासहजी मिळालेले नाही. हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी कित्येक हुतात्म्यांनी आपल्या जीवनाची आहुती दिली आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, मदनलाल धिंग्रा, चाफेकर बंधू अशी कित्येकांची नावे घेता येतील. हा इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात आहेच, आपण आता स्वतंत्र भारतात वावरत आहोत. या स्वतंत्र भारतात पक्षांना समाजकारणापेक्षा अजूनही राजकारणात जास्त रस आहे. या राजकारणात स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महापुरुषांना खेचलं जातंय, ही एक शोकांतिकाच आहे. गेल्यावर्षीच्या लोकसभेच्या निवडणुकांतही आपण हे पाहिलेच आहे. एक सामान्य नागरिकाला इतिहासाची ओळख असते आणि प्रत्येक छोट्या छोट्या ऐतिहासिक मुद्यावर राजकारण करणे, हे त्याला जमत नाही. मीही असाच एक सर्वसामान्य भारतीय नागरिक असून महापुरुषांकडून जे काही चांगले शिकता येईल, ते शिकण्याचा प्रयत्न हा सुरु असतोच. काल म्हणजेच, २८ मे ला स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती. त्यांना विनम्र अभिवादन.

     तुम्हाला आठवत असेल की गेल्यावर्षी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने “सावरकर: नायक की खलनायक” असा कार्यक्रम घेतलेला आणि त्या कार्यक्रमात गांधीवादी, हिंदुत्ववादी आणि सावरकरप्रेमी यांनी सहभाग नोंदविलेला होता. याच कार्यक्रमानंतर त्यांची टीआरपी घसरली आणि नंतर त्यांनी त्यासाठी माफी मागितली, हे आपणासर्वांस ज्ञात आहे. असे बरेच काही आपल्या आसपास घडत असते. कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे देखील यावर बोलले आहेत. दुसरीकडे भाजप आणि इतर उजव्या संघटनांनी सावरकर कसे हे देशभक्त आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न हा केलाच आहे. त्यामुळे आपल्या समोर नेहमीच एकंदरीत “ गांधी की सावरकर” असा विषय ठेवला जातो आणि मान्यवर विविध संदर्भ घेऊन याविषयी वादविवाद करत असतात. “गांधी की सावरकर” यापेक्षा ”गांधी आणि सावरकर” असे का असू शकत नाही ? हा प्रतिप्रश्न मला पडतो. गांधी की सावरकर, हे असे विषय घेऊन सामान्य नागरिकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न हा सुरु असतो. म्हणजेच या दोन्ही महापुरुषांपैकी एकाची निवड करा असाच होतो. गांधी निवडला तर सावरकरांचा तिरस्कार करा आणि सावरकर निवडले तर गांधींचा तिरस्कार करा, अशीच एकंदरीत परिस्थिती सध्या दिसत आहे. आता फेसबुक आणि आणि व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून मला हे उघड उघड दिसत आहे. भविष्यात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधी यांच्या चरित्राचा अभ्यास करून संदर्भासहित काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करेन.

     एक पक्ष आणि एका विचारसरणीला वाहून घेतल्यानंतर दुसऱ्या महापुरुषाविषयी तिरस्कार करणे हे किती योग्य आहे? मुळात आपली संस्कृती दुसऱ्यांच्या विचारांचा द्वेष करायला शिकवत नाही उलट त्याचा आदरच करायला शिकवते, ह्या विचाराचा विसर भारतीय राजकारण्यांना आणि त्यांच्या अनुयायांना नक्कीच पडलेला आहे. हे असेच विविध पक्ष आणि विचार एकमेकांसोबत भांडत असतील आणि हे असेच चालू राहिले तर विकासाचा मुद्दा तुम्ही विसरूनच जा. इतिहासात बऱ्याच गोष्टी ह्या घडून गेल्या आहेत, इतिहास हा जश्याचा तसा स्वीकार करावा लागतो. आपण एक मात्र नक्कीच करू शकतो ते म्हणजे इतिहासातील झालेल्या चुका टाळणे. त्यांचे तेंव्हाचे विचार आताच्या काळात लागू पडतीलच असे नाही. भारतीय राजकारणात दुसऱ्याला चुकीचे म्हणून स्वतः कसे बरोबर आहोत, याची चढाओढ ही सुरु असतेच.

     ह्या ब्लॉगचा उद्देश “ गांधी की सावरकर” हे ठरविणे नसून याच्यापुढे जाऊन काय करता येईल याविषयी आहे. हे एकमेकांविषयीचा तिरस्कार कुठे तरी संपायला हवा, त्यामुळे बदल कुठे करता येईल याचा विचार करण्यास नक्कीच वाव आहे. सामान्य नागरिकाच्या मते तर महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यामध्ये योगदान दिले आहे. दोन व्यक्तींना एकमेकांसमोर उभे करून विकास हा साधता येत नाही. महात्मा गांधी यांच्या विचारांनी संपूर्ण जग प्रभावित आहे आणि त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न ती राष्ट्रे करत आहेत. भारताच्या उज्वल भविष्याबद्दल विचार करता, महात्मा गांधी यांचे विचार मार्गदर्शक आहेत तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विज्ञाननिष्ठ विचार देखील हे मार्गदर्शक आहेतच. भारताचे माजी पंतप्रधान कै. अटलबिहारी वाजपायी यांनी लोकसभेतील एका भाषणात बोलले आहेत की, “ मतभेद ह्या असूद्यात पण मनभेद नको. सरकार येतील आणि जातील पण हा देश टिकला पाहिजे” आणि याच विचाराचे समर्थन पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी करतात. “गांधी आणि सावरकर” यातील 'आणि' या शब्दाला खूप मोठे अर्थ आहे, तो अर्थ आपल्याला लक्षात येईल इतकी आशा करतो. ह्या शब्दाचा अर्थ भारतीय राजकारण्यांना तसेच त्यांच्या अनुयायांना कळणे जास्त महत्वाचे आहे. भारताच्या सामान्य नागरिकांना देखील ठरवायचे आहे की, अशा कुत्सित विचारांत गुरफटून राहायचे आहे की हे सगळे झुगारून उज्वल भविष्यासाठी वाटचाल करावयाची आहे. मला याची पूर्ण कल्पना आहे की हा ब्लॉग खूप वर वरचा आहे पण ह्या राजकारणात एक छोटासा बदल खूप मोठा फरक आणू शकतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे येणाऱ्या काळात महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कोण कोणते विचार भारताच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील, तेही मांडण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.

Saturday, May 23, 2020

माझ्या राज्यातील राजकारण


माजी मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस आणि इतर (फोटो सौजन्य: मा. देवेंद्र फडणवीस फेसबुकवरून साभार )

माझ्या देशातील राजकारणावर लिहायचे तूर्तास मी टाळले होते कारण त्यासाठी आवश्यक अशी प्रतिभा आत्मसात करावी लागते, त्यासाठी बराच अभ्यास करावा लागतो. माझे असे ठरलेले की पुढील एखाद्या वर्षात यावर लिहायला सुरुवात करायची, पण असो. गेली ३ एक वर्ष भारतीय राजकारणाचे निरीक्षण करतोय आणि त्यातूनच माझे स्वतःचे मत बनत जात आहे. सध्या जगावर आलेली कोविड १९ ची महामारी आणि माझ्या राज्यातील राजकारण यावर. काल म्हणजे २२ मे २०२० ला महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने संपूर्ण राज्यभर महाविकास आघाडीचे सरकार असक्षम आहे, हे त्यांच्या दृष्टीकोनातून सांगण्याचा प्रयत्न केला. या कोविड १९ च्या महामारीत हे राजकारण योग्य आहे का? हा एक साधा प्रश्न मला भेडसावत आहे. त्याचे उत्तरही तितकेच सोपे आहे ते म्हणजे अशा राजकारणाची बिलकुल आवशकता नाही. पण शेवटी ते राजकारण आहे तिथे अशा गोष्टींना किंमत नाही उलट तिथे महत्वाचे असते आम्हाला सत्ता कशी उपभोगता येईल आणि त्यासाठी आवश्यक डावपेच खेळले जातात. कर्नाटक, मध्यप्रदेश हे त्याची ताजे उदाहरणे. आम्ही हे राजकारण देखील समजून घ्यायला तयार आहोत. पण तो वरचा प्रश्न तितकाच महत्वाचा आहे.

आपण थोडे मागे जाऊयात, जेंव्हा सांगली आणि कोल्हापूरात महापूर आलेला तेंव्हा मुख्यमंत्रीपद माजी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होते, तेंव्हा ते पत्रकार परिषदेमध्ये बोलले होते की यावर कोणीही राजकारण करू नका. आता याला दुहेरी खेळी म्हणावे लागेल. म्हणजे सत्ता उपभोगतानाचे एक मत आणि विरोधी पक्षात असतानाचे एक मत. साहजिकच हे कोणाच्याच सद्सद्विवेकबुद्धीला पटणार नाही. शेवटी संपूर्ण जग एकीकडे आणि राजकारण एकीकडे. सध्या कोविड १९ च्या महामारीने जग ग्रासले असताना पक्ष, विचारधारा हे सगळे सोडून एकमेकांना सहकार्य करून ही लढाई कशी जिंकता येईल याचा विचार करण्याऐवजी ह्यांना राजकारण सुचत आहे, ही भारतीय राजकारणाची मोठी शोकांतिका. मा. देवेंद्रजी आणि सहकारी, कोविड १९ मुळे संपूर्ण जग ग्रासले गेले आहे. अमेरिकेत १६ लाख रुग्ण, ब्राझील आणि रशिया मध्ये हा आकडा ३ लाख च्या वर आहे. भाजपा सरकारला असे म्हणायचे आहे का की अमेरिकेतील, रशिया आणि इतर देशातील सरकारही असक्षम आहे? तेवढे लांब तर कशाला जायचे महाराष्ट्र राज्याला चिकटून असलेल्या गुजरातमधेही १० हजारच्या वर रुग्ण आहेत मग तेथील सरकारही अपयशी ठरले का ? गुजरात मध्ये तर भाजपचीच सत्ता आहे. कोविड १९ हा संसर्गजन्य रोग असून त्याच्या फैलावाचा वेग हा खूप जास्त आहे. त्यात छोट्याश्या मुंबईत लोकसंख्येची घनता खूप जास्त असल्याकारणाने तिथे हा रोग पसरण्याचा वेग ही जास्त असणे, हे स्वाभाविक आहे. सगळा दोष सरकारचाच आहे असेही नाही, आपण एक महान देशाचे सुजाण नागरिक म्हणूनही अपयशी ठरलो आहोत.

राजकारणात कोणीच “दुध के धुले” नसतात. ही गोष्ट जितकी भाजपाच्या सर्व आमदार आणि नेतृत्वाला लागू पडते तितकीच ती इतर पक्षांना लागू पडते. कॉंग्रेसनेही राजकारण केलेच आहे. सगळेच पक्ष हे राजकारण करत असतात यात काही वाद नाही, पण कधी राजकारण करायचे आणि कधी नाही याबद्दल नक्कीच विचार होऊ शकतो. कोविड १९ मुळे संपूर्ण मानवी जीवनावर, त्याच्या राहणीवर परिणाम होत आहे. कोविड १९ मुळे बरेच फटके जगाला बसणार आहेत. राजकारण हे असे क्षेत्र आहे जिथे सगळेजण एकमेकांना चोर म्हणतात, पुढचा कसा चुकत आहे हे सांगतात. पण कोणीच स्वतः अंतर्मुख होऊन विचार करत नाही (मुळात हा आपला मानवी स्वभाव आहे). भाजपच्या या राजकारणाने भारतीय राजकारण जगासमोर आणले आहे. आता वेळ आली आहे की, भारतीय राजकारणाला अंतर्मुख होऊन विचार करण्याची. एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा सामंजस्याने एखादा प्रश्न कसा मार्गी लावता येईल, याचा विचार होणे जास्त महत्वाचे. कोविड १९ मुळे घरी बसून आहात तर सर्व पक्षांनी जरा अंतर्मुख होऊन विचार करा. आपण करत असलेल्या राजकारणाची मनाला जरा लाज वाटू द्या.

वर उल्लेख केल्याप्रमाणे एका महान देशाचे सुजाण नागरिक म्हणून देखील आपण अपयशी ठरलो आहोत. कोणत्याही पक्ष, विचारधारेला वाहून घेण्याअगोदर आपण सर्वांनी देखील थोडा अभ्यास करणे आवशक आहे. पक्ष श्रेष्ठींनी घेतलेले सर्व निर्णय बरोबर असतीलच असे नाही ना. कालच्या राजकारणाला सर्व भाजपच्या सहकार्यांनी पाठींबा दिला पण कोणीच त्यांच्या नेतृत्वाला प्रतिप्रश्न केला नाही. म्हणजेच आंधळेपणाने निर्णयाचे पालन केले गेले. जसे भारतीय राजकारणाला अंतर्मुख होऊन पाहण्याची गरज आहे तसेच आपण एक नागरिक म्हणून देखील आपल्याला अंतर्मुख होण्याची गरज आहे. यामध्ये थोडा अलिप्त राहून आपल्या सद्सद्विवेकबुद्धीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. शेवटी इतकंच की, घरी रहा आणि सुरक्षित रहा आणि अशा  होणाऱ्या घडामोडींना प्रतिप्रश्न करा.